श्यामसुंदर राठी सारख्या निष्ठावान समाजसेवकांची समाजाला गरज आहे" — आमदार सुमीत वानखेडे
नावेद पठाण वर्धा
आर्वी : प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारे लोक आज फारच कमी उरले आहेत. ज्या कार्यासाठी आपली नियुक्ती झाली आहे, त्या कामाला न्याय देऊन समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणे हीच खरी सेवा होय. अशा कार्यशैलीचा ठसा आपल्या कामातून उमटविण्याचा प्रयत्न श्यामसुंदर राठी यांनी केला असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा निष्ठावान आणि प्रामाणिक समाजसेवकांची समाजाला आज अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन आमदार सुमीत वानखेडे यांनी केले.
ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त भारत सेवक समाज, आर्वी तर्फे ज्येष्ठ समाजसेवक श्यामसुंदर राठी यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते. या वेळी मंचावर ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, माजी नगर परिषद अध्यक्ष डॉ. वसंत गुल्हाणे आणि संस्थेचे सचिव जगन्नाथ बेलवे प्रमुख उपस्थित होते.
श्यामसुंदर राठी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. शालेय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण आणि ग्रामीण भागातील गरजूंना ब्लॅंकेट वाटप अशा उपक्रमांद्वारे त्यांनी समाजाला दिलासा दिला आहे, अशी भावना इमरान राही यांनी व्यक्त केली.
संस्थेतर्फे त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्यामसुंदर राठी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹21,000/- रुपयांचा धनादेश आमदार सुमीत वानखेडे यांच्या सुपुर्द केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव जगन्नाथ बेलवे यांनी केली, संचालन नंदकिशोर दिक्षीत यांनी केले तर आभार प्रेमराज पालीवाल यांनी मानले. या कार्यक्रमाला सुरेश चांडक, दिलीप खंडेलवाल, ऍड. मनोहर गुल्हाणे, अनिल जोशी यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.